विरारच्या अमूल दूध कंपनीत गॅसगळती; पाच जणांना बाधा, रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तारापूरच्या बगेरिया केमिकल्समध्ये ओलियम वायूच्या गळतीने दोन दिवसांपूर्वी हाहाकार उडाला असतानाच विरारमध्येही अमूल दूध कंपनीत अमोनिया वायूची गळती झाल्याची घटना घडली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असताना या कंपनीत अमोनिया वायूची अचानक गळती झाल्याने एकूण पाच कामगार बाधित झाले. या सर्व कामगारांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, वेळीच परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विरार पूर्वच्या कण्हेर फाटा येथे अमूल दूध कंपनीचा मोठा प्रकल्प आहे. दुधापासून विविध पदार्थ या कंपनीत तयार केले जातात. मंगळवारी कंपनी प्रशासनाने प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. काम सुरू असताना सकाळी साडेअकराच्या सुमारास अमोनिया गॅसची गळती झाली. त्यावेळी कंपनीत ७० हून अधिक कामगार होते. गॅसगळती झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षेचा उपाय म्हणून काही कर्मचारी बाहेर धावत सुटले. मात्र काही जणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. वायूमुळे गुदमरलेल्या पाच कामगारांना पेल्हार येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने गॅसगळती थांबविण्यात यश आले.

महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर
घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली आहे. सर्व महिला कर्मचारी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात शुभांगी पवार (४०), रिना बोकफोडे (३९), अपूर्वा इंगळे (१९), सनम खान (२०), अंकिता राजभर (१९) यांचा समावेश आहे.

गॅसगळती झाल्याने कामगारांमध्ये पळापळ झाली. एकामागून एक कामगार बाहेर पडू लागले. यामध्ये पाच कामगारांना श्वसनाचा त्रास झाला. मांडवी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वेळीच परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली