हिंदुस्थानात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झाले दुप्पट, लॅन्सेटची धक्कादायक आकडेवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) रुग्णसंख्येत गेल्या काही दशकांत मोठी वाढ झाली असून 1990 ते 2023 या कालावधीत ही संख्या दुप्पटपेक्षा अधिक झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. 204 देशांतील आकडेवारीच्या आधारे करण्यात आलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष समोर आला आहे. ‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी’ (The Lancet Oncology) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी – ब्रेस्ट कॅन्सर कोलॅबोरेटर्सच्या अहवालानुसार, सहा बदलता येणाऱ्या जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवले नाही तर 2050 पर्यंत या आजाराच्या रुग्णसंख्येत आणखी मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

अभ्यासानुसार, हिंदुस्थानमध्ये 1990 मध्ये प्रति 1 लाख महिलांमागे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 13 इतके होते. ते 2023 मध्ये वाढून 29.4 प्रति 1 लाख महिलांपर्यंत पोहोचले आहे. याच कालावधीत वयोमानानुसार प्रमाणित मृत्यूदर 8.9 वरून 15.5 पर्यंत वाढला असून, स्तनाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 74 टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

2023 मध्ये जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे अंदाजे 23 लाख नवे रुग्ण आढळले, तर 7.6 लाख मृत्यूंची नोंद झाली. उपचारपद्धती आणि वैद्यकीय प्रगती होत असतानाही 2050 पर्यंत रुग्णसंख्या सुमारे एकतृतीयांश वाढून 35 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे ‘लॅन्सेट’च्या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर 2023 मध्ये 55 वर्षांवरील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे नवे रुग्ण प्रमाण 20 ते 54 वयोगटातील महिलांपेक्षा सुमारे तीनपट जास्त होते. 55 वर्षांवरील महिलांमध्ये प्रति 1 लाख महिलांमागे 161 नवे रुग्ण आढळले, तर 20 ते 54 वयोगटात हे प्रमाण 50 होते. मात्र 1990 नंतर 20 ते 54 वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या नव्या रुग्णांमध्ये 29 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. वयातील बदल तसेच रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांमध्ये जोखीम घटकांतील फरक यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

अभ्यासानुसार, हिंदुस्थानसारख्या मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे होणारा आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2021 मध्ये या आजाराचा एकूण आर्थिक भार सुमारे 8.13 अब्ज डॉलर इतका होता. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास 2030 पर्यंत हा खर्च 14 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की स्तनाच्या कर्करोगामुळे गमावल्या जाणाऱ्या निरोगी आयुष्याच्या वर्षांपैकी एक चतुर्थांशाहून अधिक नुकसान सहा बदलता येणाऱ्या जोखीम घटकांमुळे होते. यामध्ये लाल मांसाचे जास्त सेवन, तंबाखूचे सेवन, रक्तातील साखरेची जास्त पातळी, जास्त शरीरवजन (BMI) यांसारख्या घटकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी महत्त्वाची संधी उपलब्ध असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे.

नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. (प्रो.) ज्योती बाजपेयी यांनी सांगितले की, “2050 पर्यंत स्तनाच्या कर्करोगाचे वाढते ओझे हे नियती नाही, तर भविष्यातील अंदाज आहे आणि त्यामुळे ते टाळता येऊ शकते. संघटित तपासणी, वेळेवर निदान आणि पुराव्यावर आधारित उपचार सर्वांसाठी उपलब्ध झाले तर या वाढत्या प्रवृत्तीला आळा घालता येऊ शकतो. विज्ञान तयार आहे, आता कृती करण्याची वेळ आली आहे.”

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, एखाद्या देशाचा विकासाचा स्तर वाढला की काही कर्करोगांचे प्रमाणही वाढताना दिसते. हिंदुस्थानमध्ये विशेषतः स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रजनन पद्धतीतील बदल, तंबाखू व मद्यसेवनात वाढ यांसारखी कारणे यामागे असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नव्या अभ्यासानुसार पाश्चिमात्य देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा भार आता स्थिरावला असून तेथील मृत्यूदर तुलनेने कमी झाला आहे.

टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ येथील वरिष्ठ वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कुमार प्रभाष यांनी सांगितले की, “हा अभ्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान सुधारत असल्याचे दर्शवतो. मात्र विकसित आणि विकसनशील देशांमधील उपचार व आरोग्यसेवेतील दरी अजूनही मोठी आहे आणि ती भरून काढणे आवश्यक आहे.”

संशोधकांनी असेही स्पष्ट केले की सर्व महिलांना स्तनाच्या कर्करोगातून जगण्याची समान संधी मिळण्यासाठी आक्रमक प्रतिबंधात्मक धोरणे, वेळेवर निदान करणारी सक्षम आरोग्य व्यवस्था आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध व परवडणाऱ्या कर्करोग उपचारसेवा अत्यावश्यक आहेत.