9 तासांची शिफ्ट संपल्याने लोको पायलटने गाडी थांबवली; तब्बल तीन तास प्रवासी ताटकळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या नियमांनुसार 9 तासांची ड्युटी संपल्याने लोको पायलटने रेल्वेस्थानकातच गाडी थांबवून ठेवली. यामुळे मालडा ते सिलीगुडी जाणारी डेमू ट्रेन तब्बल 3 तास ठाकूरगंज स्थानकावर उभी होती. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मालडा ते सिलीगुडी डेमू ट्रेन बुधवारी दुपारी 2.52 वाजता किशनगंज जिल्ह्यातील ठाकूरगंज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पोहोचली. गाडी स्थानकात पोहोचताच लोको पायलटने 9 तासांची शिफ्ट सांगत रेल्वे सुरक्षा नियमांनुसार 9-10 तासांपेक्षा जास्त काम करणे धोक्याचे असल्याने त्याने पुढील प्रवास करण्यास नकार दिला.

या गाडीमध्ये मोठ्या संख्येने व्यापारी, मजूर आणि कुटुंबे प्रवास करत होती. तीन तास गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ आणि संतापाचे वातावरण होते. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुसऱ्या चालकाची व्यवस्था करेपर्यंत प्रवाशांना स्थानकावरच ताटकळत राहावे लागले.