
एसटीच्या चालक-वाहकांना दररोज कामावर हजर होण्यापूर्वी मद्यपान तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत एसटी महामंडळाने ही कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व आगारांत चालक-वाहकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे मद्यपान तपासणी करण्यात येणार आहे. त्याच्या योग्य नोंदी घेऊनच चालक-वाहकांना कर्तव्यावर पाठवण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. चालक-वाहकांवर दक्षता विभाग गोपनीय मोहिमांद्वारे पाळत ठेवणार आहे.
जानेवारी अखेरीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली होती. तेथील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहामध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या होत्या. तसेच काही कर्मचारी दारुच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाने सर्व चालक-वाहकांना नियमित मद्यपान तपासणी बंधनकारक केली आहे. नव्या उपाययोजनांनुसार, आगारात कामावर हजर होणाऱया चालक आणि वाहकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे.




























































