
शेवगाव-गेवराई रोडवरील हॉटेल ‘राजयोग’ येथे सुरू असलेल्या देहविक्री अड्डय़ावर अहिल्यानगर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत बांगलादेशातून आणलेल्या तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलमालकासह सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने शेवगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
हॉटेलमालक बाबासाहेब रामभाऊ अंधारे (रा. शेवगाव), अजिंक्य विठ्ठल अंधारे (रा. शिवाजीनगर, शेवगाव), कृष्णा बापू झिरपे (वय 25, रा. कोळगाव), प्रतीक मिलिंद रांधवने (वय 28, रा. माळीवाडा), अमोल पठाडे (रा. नेवासा) आणि अमर मारुती ढाकणे (रा. हसनापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शेवगाव येथील हॉटेल ‘राजयोग’चा मालक तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवत आहे, तसेच या मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीशीर माहिती ‘प्रीडम फर्म’ या सामाजिक संस्थेला मिळाली होती. या संस्थेने ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक हमीद शेख व अनैतिक मानवी तस्करीविरोधी कक्षाच्या पथकाने आज ‘राजयोग’ हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांनी बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठविला. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पथकाने धाड टाकली. यावेळी हॉटेलच्या खोल्यांमध्ये तीन पीडित मुलींना डांबून ठेवल्याचे आढळून आले. या मुलींना एजंटमार्फत भारतात आणल्याचे तपासात समोर आले. सर्व आरोपींविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हमीद शेख, शकील शेख, अर्चना काळे, छाया रांधवन यांच्यासह मानवी तस्करीविरोधी कक्षाच्या (एएचटीयू) पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.




























































