
इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक आठवडा पूर्ण झाला आहे. गेल्या शनिवारी इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हवाई हल्ले करत केले आणि युद्धाला तोंड फुटले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा खात्मा झाला होता. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनेही इस्रायल आणि आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीने तुफान हल्ले चढवले. हे युद्ध आता आणखी पेटणार असून इराणासाठी आजची रात्र काळरात्र ठरणार असल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेच्या या धमकीने जगाला धडकी भरली आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणवर आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकन सैन्य इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेवर प्रहार करत असून दोन आघाड्यांवर प्रभावी मोहीम राबवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे संयुक्त हल्ले सुरू असून इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपली लष्करी कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फॉक्स बिझनेस’च्या एका शोमध्ये बोलताना बेसेंट यांनी आजची रात्र इराणसाठी अत्यंत विनाशकारी ठरणार असल्याचे म्हटले आहे.
संरक्षण सचिव पीटर हेग्सेथ, जनरल केन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे आज रात्री आमची आतापर्यंतची सर्वात मोठी बॉम्बफेक मोहीम असेल. आम्ही इराणचे क्षेपणास्त्र लाँचर्स आणि क्षेपणास्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे जास्तीत जास्त नुकसान करू, असे ते म्हणाले. तसेच अमेरिकन सैन्य इराणची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमकुवत करत आहे. इराण सध्या दोन आघाड्यांवर लढत आहे आणि तिथे आमची मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Iran War – इराणने बिनशर्त शरण यावे, त्यातच त्यांचे भले; ट्रम्प यांची पुन्हा धमकी
दरम्यान, इराणसोबतच्या युद्धामुळे जागतिक तेल बाजारात समतोल राखण्यासाठी अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. समुद्रात अडकलेले रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने हिंदुस्थानला 30 दिवसांची विशेष सवलत दिली आहे. तसेच अमेरिका रशियन तेलावरील आणखी निर्बंध हटवू शकते, असे संकेतही बेसेंट यांनी दिले आहेत.
आम्ही इतर रशियन तेलावरील निर्बंधही काढून घेऊ शकतो. कोट्यवधी बॅरल प्रतिबंधित कच्चे तेल समुद्रात अडकलेले आहे. यावरील निर्बंध हटवून ट्रेजरी विभाग तेलाचा पुरवठा वाढवू शकतो आणि आम्ही सध्या यावर विचार करत आहोत, असे ते म्हणाले.

























































