जींदमध्ये रंगाच्या कारखान्याला भीषण आग; 4 महिला कामगारांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील जींद येथे आज सकाळी एका रंग बनवण्याच्या कारखान्यात भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी कारखान्यात एकूण 17 कामगार उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत पिंकी (रा. सिंगपुरा), पूजा (रा. सफिदोन), दिग्गी मोहल्ला येथील एक महिला आणि आदर्श कॉलनीतील रहिवासी उषा यांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी 6 जणांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रोहतक येथे हलवण्यात आले आहे. रोहतक पीजीआयमध्ये सध्या 5 जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत पवन नावाचा एक तरुण 8 टक्के भाजलेल्या अवस्थेत सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

प्रशासनाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र तोपर्यंत कारखान्याचे आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.