
ICC T20 World Cup 2026 चा अंतिम सामना उद्या (8 मार्च 2026) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तुंबळ लढाई पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, हिंदुस्थानी चाहत्यांची धाकधूक वाढत चाललीय. सोशल मीडियावर तशा चर्चाही रंगताना दिसत आहे. पण असं का? नरेंद्र मोदी स्टेडिमयवर हिंदुस्थानचा रेकॉर्ड इतका खराब आहे का?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया हे दोन तुल्यबळ संघ 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये एकमेकांना भिडले. टीम इंडियाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमवर हजर होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात ट्रेव्हिस हेडच्या वादळाचा जोरदार तडाखा हिंदुस्थानला बसला. त्याने 137 धावांची खेळी करत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा नेस्तनाबूत केल्या. टीम इंडियाचा पराभव झाला. तसेच आता सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यात अपराजीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेने पराभवाचा धक्का दिला. याच मुळे मोठे सामने आणि नरेंद्र मोदी स्टेडियम हे समीकरण जुळून आलं की चाहत्यांची धडधड वाढते, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. या मैदानावर आतापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी टीम इंडियाला पराभवाची धुळ चारली आहे.
अहमदाबाद आणि टीम इंडिया
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. या 10 सामान्यांपैकी 7 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला असून 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांचा विचार करता, या मैदानावर या दोन्ही संघांमध्ये एकवेळा भिडत झाली आहे. या एकमेव सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा तब्बल 168 धावांनी फडशा पाडला होता.

























































