पत्रकार हत्या प्रकरणी राम रहिमची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, इतर ३ जणांची शिक्षा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आज एका मोठा दिलासा दिला आहे. २००२ मधील पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली असून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र न्यायालयाने कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्ण लाल या तीन आरोपींची शिक्षा कायम ठेवली.

काय आहे प्रकरण?

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी आपल्या ‘पूरा सच’ या वर्तमानपत्रातून डेरा सच्चा सौदा मधील महिलांच्या शोषणाबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी १७ जानेवारी २०१९ रोजी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीम आणि इतर सर्व आरोपींना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निकाल देताना उच्च न्यायालयाने म्हटले की, राम रहीमचा हत्येत सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. परिणामी राम रहीमची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

दरम्यान, राम रहिमची या प्रकरणात मुक्तता झाली असली, तरी तो सध्या साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे या निकालामुळे त्याला तत्काळ तुरुंगाबाहेर येता येणार नाही. रणजित सिंग हत्या प्रकरणातही यापूर्वी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.