नांदेड बसस्थानकासह अनेक प्रार्थना स्थळं बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी, अंबाजोगाई येथून एकास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडच्या मध्यवर्ती स्थानकासह शहरातील अनेक प्रार्थना स्थळांमध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस, सायबर सेल, बॉम्ब शोध व नाशक पथक यांच्यासह दहशतवाद विरोधी पथकही तातडीने सक्रिय झाले. चौकशीअंती हा सर्व प्रकार एका मनोरुग्णाकडून झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपास यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.

नांदेड मध्यवर्ती बसस्थानकासह शहरातील काही भागात असलेल्या प्रार्थना स्थळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून अटक करण्यात आली आहे. शेख सलीम शेख चांद पाशा (वय – 35, रा. मणियार गल्ली, रविवार पेठ, अंबाजोगाई, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत त्याने यापूर्वी छत्रपती संभाजीनगरसह इतर शहरांमध्येही असे फसवे कॉल केले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत.

जिल्हा पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षातून वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना माहिती मिळाली की, एका अनोळखी मोबाईल धारकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात फोन करून ‘मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे’, असे सांगितले. तसेच बस स्थानक येथील तक्रार पेटीमध्ये चिट्ठी टाकलेली आहे. त्यामध्ये शहरात काही भागातील प्रार्थना स्थळांमध्ये बॉम्बब्लास्ट होणार असल्याचेही कळवले आहे. ही बाब समजताच पोलीस निरीक्षक कदम यांनी तात्काळ वजिराबाद येथील पोलीस चौकीवरील अंमलदारांना फोन करून बस स्थानकातील तक्रारपेटी तपासण्यास सांगितले. त्यावेळी तक्रार पेटीमध्ये बॉम्बब्लास्टबाबत मजकूर असलेली चिट्ठी आढळून आली.

हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस निरीक्षक कदम यांनी एक पथक तयार केले. चौकशीदरम्यान सदर मोबाईलधारकाचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेतला असता तो अंबाजोगाई येथील पाणीपुरी विक्रेता असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने अंबाजोगाई येथे जात त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने एका अनोळखी व्यक्तीने ईमर्जन्सी कॉल करायचा सांगून आपला फोन घेतल्याचे सांगितले. मात्र यामुळे आरोपीचा माग काढता येत नसल्याने अखेर पोलिसांनी पाणीपुरी विक्रेत्याकडून संशयिताचे वर्णन प्राप्त केले.

वजिराबाद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अंबाजोगाई येथील स्थानिक पोलीस स्टेशन तसेच नांदेड दहशतवाद विरोधी पथक यांच्या मदतीने कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यावेळी नमूद वर्णनाचा व्यक्ती संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. शेख सलीम शेख चांद पाशा असे त्याचे नाव असून त्यानेच मोबाईलवरून नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात फोन करून बसस्थानकातील तक्रार पेटीमध्ये चिठ्ठी टाकून माहिती दिली असल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध पोहेकॉ बालाजी नागमवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे.