तरुणांमध्ये ‘कम्युनिटी ट्रॅव्हल’चा वाढता ट्रेंड; अनोळखी लोकांसोबत प्रवास करण्याचे प्रमाण सर्वाधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या तरुण पिढीत प्रवास करण्याच्या पद्धतीत मोठा बदल दिसून येत आहे. विशेषतः मिलेनियल्स आणि जेन झी या पिढीतील अनेक तरुण आता ‘कम्युनिटी ट्रॅव्हल’कडे वळताना दिसत आहेत. या प्रकारात प्रवासी अनोळखी लोकांसोबत ग्रुपमध्ये प्रवास करतात. नवीन लोकांना भेटणे, मैत्री करणे आणि वेगळे अनुभव घेणे या उद्देशाने हा ट्रेंड झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

कम्युनिटी ट्रॅव्हलमध्ये अनेकजण सोलो ट्रॅव्हलर म्हणजेच एकटे प्रवास करणारे असतात. मात्र ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या अनेक लोकांचा गट तयार केला जातो आणि ते सर्वजण एकत्र प्रवास करतात. त्यामुळे एकटे प्रवास करणाऱ्यांना नवीन मित्र मिळतात आणि प्रवास अधिक आनंददायी होतो. नवीन व्यक्ती भेटल्यामुळे, आपल्या आवडी निवडी शेअर केल्या जातात. तसेच विविध लोक एकत्र आल्यामुळे अनेक विषयांवर चर्चा देखील होते.

ग्रुप ट्रिपमध्ये फ्लाइट, हॉटेल, स्थानिक प्रवास आणि पर्यटनस्थळांना भेट देणे याचे नियोजन ट्रॅव्हल कंपनीकडून केले जाते. त्यामुळे प्रवाशांना वेगळे नियोजन करण्याची गरज राहत नाही. तसेच गटामध्ये प्रवास केल्यामुळे अनेक खर्च वाटून घेतले जातात, त्यामुळे प्रवास तुलनेने स्वस्तही पडतो. तज्ज्ञांच्या मते, आजच्या धावपळीच्या जीवनात नवीन लोकांशी ओळख वाढवणे आणि प्रवासाचा आनंद घेणे यासाठी कम्युनिटी ट्रॅव्हल हा तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय होत असलेला एक नवीन ट्रेंड बनत आहे.