
स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दु शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्यकाव्य पुरस्कार ठाणे येथील प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदा 28 वे वर्ष असून 25 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच ना. धों. महानोर राज्य पुरस्कार कवयित्री तथा ललित लेखिका मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना घोषित झाला आहे. 10 हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या गुढीपाडव्यास गुरुवारी (ता.19) सायं.7.00 वा. जालना येथे ‘कवितेचा पाडवा’ या गाजलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
रविवारी ( ता. 08) संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका, कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर, अनुभव प्रतिष्ठान चे सचिव पंडितराव तडेगावकर यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.
पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची सुरेल काव्यमैफल रंगणार आहे. रसिकांनी गौरवशाली साहित्यिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी बलवंत धोंगडे, वृषाली किन्हाळकर, फ.मुं.शिंदे , स्व.भगवान देशमुख, रामदास फुटाणे, इंद्रजीत भालेराव, नीरजा, मनोज बोरगावकर लोकनाथ यशवंत, विष्णूसूर्या वाघ, राजन गवस, प्रज्ञा दया पवार, अरुणा ढेरे, अनुराधा पाटील, रेखा बैजल, दासू वैद्य, सौमित्र, विजय चोरमारे, प्रकाश होळकर, आदी दिग्गज कवी, साहित्यिकांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


























































