
मुंबईवर ‘अदानी’सारख्यांचे संकट घोंघावत असताना किती गुजराती बांधव महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहिले? जर ते मुंबई-महाराष्ट्रापेक्षा अदानीवर त्यांचा जीव ओवाळून टाकणार असतील तर प्रत्येक मराठी माणसाला भाषा व महाराष्ट्र धर्म म्हणून आवाज उठवावाच लागेल. प्रश्न घाटकोपरच्या स्मशानभूमीतल्या गुजराती ‘पावत्यां’चा नाही, तर महाराष्ट्राचेच खाऊन मराठीशी बेइमानी करणाऱ्या ‘पावट्यां’चा आहे. आज स्मशानभूमीत आक्रमण झाले, उद्या गेटवे ऑफ इंडियाचे रंगरूप बदलण्याचा प्रयत्न होईल. त्यानंतर हुतात्मा चौकावर आक्रमण होईल. संख्याबळावर, पैसा व सत्तेच्या मुजोरीवर कोणालाही मराठीचा अपमान करता येणार नाही. त्यांच्या गोवऱ्या घाटकोपरच्या स्मशानभूमीतच रचल्या जातील!
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. भाजपचा ‘हिंदू मराठी’ वगैरे महापौर विराजमान झाला. सर्व सोपस्कार पार पडले. त्यामुळे भाजपने निवडणुकीसाठी तोंडावर चढवलेला मराठी प्रेमाचा मुखवटा उतरवून घाटकोपरच्या स्मशानात फेकला आहे. जणू मराठीची चिताच हिंदू स्मशानभूमीत पेटवली. घाटकोपरच्या स्मशानभूमीतील मृत्यू नोंदीच्या पावत्या गुजरातीमधून दिल्या जात आहेत व यावर आता गदारोळ उठला आहे. स्मशानभूमीत भाषिक वादाची ठिणगी पडली हे बरे नाही, पण घडले खरे. पालिकेचे सर्व दाखले मराठी आणि इंग्रजीतच हवेत असा नियम जुनाच आहे. आधी मराठी, मग इतर सगळे असे असताना त्यात गुजराती भाषा घुसवली कोणी? मुंबई पालिकेच्या अधिकृत चिन्हांसह या पावत्या कित्येक दिवसांपासून वितरित होत आहेत व या भागाचे पालिकेतले प्रतिनिधित्व विद्यमान महापौर श्रीमती रितू तावडे करीत आहेत. हीच खरी गोम आहे. मराठीच्या बाबतीत भाजपने घेतलेल्या या भूमिकेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. मराठीची अधिकृत गळचेपी करण्याची ही सुरुवात आहे. एखाद्या रेल्वे फलाटाचे नाव गुजरातीत रंगवणे, कुठे रस्त्यांची नावे गुजरातीत करणे, तर कुठे पावत्या वगैरे गुजरातीत छापणे, असे केल्याने मराठीवर आक्रमण करता येईल या भ्रमात कोणी असेल तर ते सर्वस्वी चूक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अलीकडेच ठणकावून वगैरे सांगितले की, ‘‘महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील.’’ हे खरे असेल तर घाटकोपरच्या हिंदू स्मशानभूमीत मराठी भाषेची चिता का पेटवली जात आहे? कोणाच्या आदेशाने हे
उपद्व्याप बिनबोभाट
चालले आहेत? मराठी भाषा दिवस, मराठी गौरव दिवस साजरे करायचे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्हीच कसा मिळवून दिला हे सांगायचे व त्याच मराठी भाषेवर आक्रमण होत असताना गप्प बसायचे हे काही मराठी प्रेमाचे लक्षण नाही. गुजराती एक भाषा आहे व गुजरात राज्यात त्या भाषेला प्राधान्य मिळायलाच हवे. नाटक, साहित्य, संगीत अशा क्षेत्रांत गुजराती भाषा व कलावंतांचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल हे मूळचे गुजराती भाषिक व त्यांनी राष्ट्रासाठी मोठे कार्य केले. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री हेदेखील गुजराती भाषिक असले तरी ‘मराठी’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषा आहे. मराठीच्या रक्षणासाठी शिवसेनेने जितके लढे दिले व देत आहे, तेवढे गेल्या 60-70 वर्षांत अन्य कोणी दिले असतील असे वाटत नाही. मराठी भाषा व अस्मितेसाठी सदैव लढावे लागेल ही प्रेरणाच मूळ शिवसेनेची आहे आणि जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीची अवहेलना सहन केली जाणार नाही. आज मुंबई नगरीत भाजपला ‘मराठी’ महापौर करावा लागला तो शिवसेनेच्या दबावामुळेच. अन्यथा ‘मुंबई’चे रंगढंग बदलून तिथे एखादा ‘ट्रम्प टॉवर’वाला महापौरपदी बसवायला भाजपने मागेपुढे पाहिले नसते. घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचा ‘हल्ला’ संघ आणि भाजप परिवारातर्फे याआधी झालाच होता. तसेच मीरा-भाईंदर व अन्यत्र हिंदी भाषिक महापौर करण्याच्या घोषणाही भाजप गोटातून केल्या गेल्या होत्या. त्या वेळी ‘‘मराठी सक्तीचीच बरं का?’’ असे सांगणाऱयांनी
स्वतःचे तोंड शिवून
घेतले होते. नुसते ‘‘मराठी भाषा सक्तीची’’ असे बोलून चालत नाही, तर मुंबई व आसपासच्या प्रत्येक शहराचे नेतृत्व हे सक्तीने ‘मराठी’च असायला हवे. तोंडात मराठी व पुढे स्मशानात गुजराती हे ढोंग चालणार नाही. महाराष्ट्रात जन्मापासून मृत्यूपर्यंत मराठीच हवी. मुंबईत मराठी भाषिकांना ते मांसाहारी आहेत म्हणून घरे नाकारणारे जे कोणी आहेत ते काय महाराष्ट्र व मराठीचे प्रेमी आहेत? अजिबात नाही. आपापल्या जातभाई व प्रांतभाईंच्या स्वतंत्र वसाहती करण्याचे व त्यात भूमिपुत्र मराठी माणसाला जागा नाकारण्याचे लोण पुणे-नाशकातही पोहोचले आहे. लहान मुलामुलींचे शोषण करणाऱ्या ‘महात्मा’ एपस्टीनशी संबंधित ‘ट्रम्प टॉवर’ या लोकांना चालतो, पण मराठी माणूस त्यांना आसपास नको हे ढोंगच म्हणावे लागेल. मुंबईवर ‘अदानी’सारख्यांचे संकट घोंघावत असताना किती गुजराती बांधव महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहिले? जर ते मुंबई-महाराष्ट्रापेक्षा अदानीवर त्यांचा जीव ओवाळून टाकणार असतील तर प्रत्येक मराठी माणसाला भाषा व महाराष्ट्र धर्म म्हणून आवाज उठवावाच लागेल. प्रश्न घाटकोपरच्या स्मशानभूमीतल्या गुजराती ‘पावत्यां’चा नाही, तर महाराष्ट्राचेच खाऊन मराठीशी बेइमानी करणाऱ्या ‘पावट्यां’चा आहे. आज स्मशानभूमीत आक्रमण झाले, उद्या गेटवे ऑफ इंडियाचे रंगरूप बदलण्याचा प्रयत्न होईल. त्यानंतर हुतात्मा चौकावर आक्रमण होईल. संख्याबळावर, पैसा व सत्तेच्या मुजोरीवर कोणालाही मराठीचा अपमान करता येणार नाही. त्यांच्या गोवऱ्या घाटकोपरच्या स्मशानभूमीतच रचल्या जातील!






























































