मुंबई-गोवा महामार्गावर सोनवी नाक्यावर मोठी वाहतूककोंडी, शिमगोत्सवाला आलेले चाकरमानी अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नाका परिसरात रविवारी सकाळपासून मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली असून शिमगोत्सवादरम्यान गावाकडे आलेले चाकरमानी अडकून पडले. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सोनवी पुलाजवळ सुरू असलेल्या कामांमुळे आणि अपुऱया नियोजनामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. पाच मिनिटांचा प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी संगमेश्वर पोलिसांकडून प्रयत्न सुरू असले तरी पोलिसांची संख्या कमी असल्याने होमगार्डच्या मदतीने वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र वाढती वाहने आणि अपुरे नियोजन यामुळे पोलिसांनाही मोठा ताण सहन करावा लागत आहे.

ठेकेदाराची मुजोरी सुरूच

महामार्गावरील कामे सुरू असताना योग्य उपाययोजना न केल्याने ठेकेदाराची मुजोरी सुरूच असल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहनचालक तणावात असल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळत आहे.