बनावट व्हिसा आणि तिकीटामुळे तरुणाचे परदेशातील नोकरीचे स्वप्न भंगले, वाचा नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात जाऊन चांगले आयुष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाची फसवणूक झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विमानतळावर पोहोचल्यावर त्याला समजले की, त्याचा व्हिसा आणि विमान तिकीट बनावट आहेत. हे कळताच तो भावूक होऊन विमानतळावरच रडू लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

ही घटना ढाका विमानतळावर घडली असून, मोहम्मद बाबुल होसैन असे या युवकाचे नाव आहे. होसैन याचे वय 35 असून, तो थायलंडला जाण्यासाठी विमानतळावर आला होता. मात्र सुरक्षा तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी त्याचे व्हिसा आणि तिकीट तपासले असता ते बनावट असल्याचे समोर आले. ही बाब कळताच होसैन यांना मोठा धक्का बसला आणि तो विमानतळावरच धाय मोकलून रडू लागला.

होसैन हे माणिकगंज जिल्ह्यातील एका गावात राहतात आणि ते शिवणकाम करून उदरनिर्वाह करतात. गेल्या काही वर्षांपासून तो परदेशात जाऊन नोकरी करून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहत होते. त्यासाठी त्याने अनेक वर्षे कष्ट करून पैसे साठवले.

विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत काही, एजंट्सनी होसैन यांची वारंवार फसवणूक केली. 2021 मध्ये एका एजंटने सुमारे 2.5 लाख घेतले, परंतु कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. नंतर दुसऱ्या व्यक्तीला सुमारे 50 हजार दिले, तरीही व्हिसा मिळाला नाही. 2024 मध्ये एका एजन्सीने बेलारूसला पाठवण्याचे आश्वासन देत पैसे घेतले, मात्र तेही फसवे ठरले. नंतर यूट्यूबच्या माध्यमातून त्याने एका व्यक्तीशी संपर्क साधला. त्या व्यक्तीने थायलंडमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी सुमारे 2.7 लाख रुपये घेतले. काही दिवसांनी त्याला व्हिसा, विमान तिकीट आणि नोकरीशी संबंधित कागदपत्रे पाठवण्यात आली. मात्र विमानतळावर पोहोचल्यावर ही सर्व कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

होसैनने परदेशात जाण्यासाठी आवश्यक पैसे उभे करण्यासाठी अनेकांकडून कर्ज घेतले आणि दुकानातील मालही विकला. आता त्याच्यावर मोठे कर्ज झाले असून ते कसे फेडायचे याची चिंता त्याला सतावत आहे. मुख्य म्हणजे आता त्याला त्याच्या घरी जाण्याचीही भीती वाटू लागली आहे.

परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एजंटवर अंध विश्वास ठेवून, अनेकजण मोठी रक्कम देऊ करत आहेत. त्यामुळे परदेशी जाण्याचे स्वप्न तर भंगत आहेच. शिवाय पैसाही गमवावा लागत आहे.