Iran Israel war – उद्ध्वस्त घरे…अन् नातलगांचा आक्रोश… युद्धाच्या भडक्यात कोणत्या देशात झाले सर्वाधिक मृत्यू ? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे अवघ्या काही दिवसांतच अनेक देश होरपळून निघाले आहेत. गेल्या 10 दिवसांतील हल्ले आणि प्रतिहल्ल्यांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या संघर्षाचा सर्वाधिक फटका इराण आणि लेबनॉनला बसला असून अनेक लोकांनी आपला जीव गमावल्याच्या बातम्या येत आहेत. या युद्धामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

इराणमध्ये या युद्धाचे सर्वाधिक भयंकर परिणाम दिसत आहेत. आत्ताच्या ताज्या आकडेवारीनुसार, इराणमध्ये आतापर्यंत 1,332 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो नागरिक जखमी आहेत. लेबनॉनमध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तेथे 394 लोकांचा बळी गेला आहे आणि 1000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यासोबतच इस्रायलमध्ये 13 मृत्यू व 200 जखमी, तर अमेरिकेच्या 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

या युद्धाची झळ आखाती देशांपर्यंतही पोहोचली आहे. कुवैतमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून बहरीन, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्येही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. कतर आणि जॉर्डनमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. इराकसारख्या देशात 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक लोक जखमी आहेत. सातत्याने होत असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे या देशांमधील नागरी वस्ती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होत आहे.

दरम्यान, सौदी अरेबियातील अल-खार्ज येथे झालेल्या हल्ल्यात एका हिंदुस्थानी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. परंतु हिंदुस्थानच्या दूतावासाने हे वृत्त फेटाळले आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणत्याही हिंदुस्थानी व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. तर जखमी झालेल्या हिंदुस्थानी नागरिकाची दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. सध्या त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हिंदूस्थानी दूतावास याप्रकरणी सौदी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.

Iran Israel war – इराणचे नवे नेतृत्व जास्त काळ टिकणार नाही….डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा