शक्तीपीठ महामार्ग लाडक्या उद्योगपतींसाठी रेडकार्पेट, सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटींच्या महामार्गाची गरजच काय? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“राज्यातील महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून, सर्वसामान्य जनतेच्या हितापेक्षा त्यांना आपल्या लाडक्या उद्योगपतींची काळजी अधिक आहे. कंत्राटदारांची बिले थकली आहेत, पगार द्यायला आणि लाडक्या बहिणींना पैसे द्यायला सरकारकडे निधी नाही, मग ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी? हा महामार्ग केवळ पुंजीपतींसाठी घातलेले रेडकार्पेट आहे,” असा घणाघाती सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज कळमनुरी ते हिंगोली अशी ‘शेतकरी संघर्ष पदयात्रा’ काढण्यात आली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

शक्तीपीठ महामार्गावर टीका करताना सपकाळ म्हणाले की, “वर्धा ते गोवा हा महामार्ग शेतकऱ्यांच्या फायद्याचा नसून गडचिरोलीतील खनिज संपत्ती परदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून समुद्रकिनाऱ्यापर्यंतची वाहतूक सुलभ करण्यासाठी बांधला जात आहे. हे दिवाळखोरीचे लक्षण असून, सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही.”

पंतप्रधान मोदी अमेरिकेसमोर ‘सरेंडर’

केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना सपकाळ यांनी आरोप केला की, “अमेरिकेसोबत झालेल्या व्यापारी करारामुळे देशातील शेतमालाचे आणि फळांचे भाव कोसळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर पूर्णपणे सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यावर त्याचा फायदा जनतेला दिला जात नाही, मात्र तुटवडा निर्माण झाला की भाववाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जाते. केंद्र सरकारने अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नये, तर ताठ मानेने उभे राहावे.”