काय चाललंय गिरीश महाजन? विधानपरिषदेत अनिल परब संतापले, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानपरिषदेत आज म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरून आणि रखडलेल्या घरांच्या प्रश्नावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले. “काय चाललंय गिरीश महाजन? त्यांना पहिली समज द्या (अनिल परब सभापतींना म्हणाले),” अशा शब्दांत परब यांनी आपला संताप व्यक्त केला.

पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बोलताना अनिल परब यांनी सरकारला आरसा दाखवला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन देतात, मात्र ज्यांचे स्वतःचे घर होते, तेच आज घराबाहेर आहेत, अशी टीका त्यांनी केली. “ज्यांचं घर आहे त्यांना घर मिळत नाहीये, तर बाहेरच्यांना काय मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकासकांना टेकन फॉर ग्रांटेड धरले जात असून सर्वसामान्य नागरिकांना कोणीही विचारत नाही, असे ते म्हणाले.

प्रकल्पातील रखडलेल्या भाड्याच्या प्रश्नावरून परब यांनी सरकारला धारेवर धरले. “आठ लोकांच्या भाड्याचा प्रश्न असल्याचे सरकार सांगते, पण प्रत्यक्षात लोकांना सहा-सहा महिने भाडं मिळत नाही,” असे ते म्हणाले. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक दुसरीकडे भाड्याने राहतात आणि दोन महिन्यांचे भाडे थकले की त्यांना घराबाहेर काढण्याच्या नोटिसा येतात. लोकांच्या आयुष्याची ही क्रूर थट्टा असल्याचे सांगत त्यांनी, “झारीतले शुक्राचार्य कोण बसलेत? त्यांचे डोळे फोडले पाहिजेत,” अशा तिखट शब्दांत आपला रोष व्यक्त केला.

यावेळी बोलताना परब यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांचाही उल्लेख केला. “ज्यांना तुम्ही कॅबिनेटचा दर्जा देऊन स्वयं-पुनर्विकासाचे धोरण दिले आहे, त्यांच्या बाजूचा स्वतःचा प्रोजेक्ट जर पूर्ण होऊ शकत नसेल, तर ते महाराष्ट्रात जाऊन काय सांगणार?” असा चिमटा त्यांनी काढला. म्हाडाच्या अध्यक्षांनी किंवा मंत्र्यांनी दिलेले निर्देश कोणीही जुमानत नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनातील बेलगाम अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

विकासक रद्द केल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न विचारत परब यांनी म्हाडाचे सर्व प्रोजेक्ट सी अँड डी मध्ये आणणार का? याबाबत स्पष्टता मागितली. “करू, बघू, विचार करू, अशा उत्तरांची आम्हाला अपेक्षा नाही. ठोस निर्णय घ्या, अन्यथा हा प्रश्न राखून ठेवा,” असा ते यावेळी म्हणाले.