‘बेस्ट’च्या अपघाताला जबाबदार 58 बस चालक बडतर्फ, 603 जणांचे निलंबन! सरकारची विधान परिषदेत कबुली, आता म्हणे चालकांना प्रशिक्षण देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best mumbai own buses count decreases private wet lease buses rise

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्ट बसच्या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच अपघाताला जबाबदार असणारे बेस्ट उपक्रम आणि भाडेतत्त्वावरील बस पुरवठा संस्थेचे एकूण 58 बस चालक बडतर्फ आणि तब्बल 603 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. सरकारकडून विधान परिषदेत ही माहिती देण्यात आली.

‘बेस्ट’च्या वाढलेल्या अपघातांसंदर्भात शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधत सद्यस्थिती मांडण्याची मागणी केली. यावर माहिती देताना बेस्टचे वाढलेल्या अपघातांबाबत सरकारकडून आकडेवारीच सादर करण्यात आली. यानुसार अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या चालकांसह इतर कारणांसाठी 2022 ते 2025 या कालावधीत 63 बस चालक आणि एकूण 876 बस चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली.

भाडेतत्त्वावरील बेस्टचे अपघात सर्वाधिक

बेस्ट अपघातांमध्ये भाडेतत्त्वावरील बस चालकांकडून होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे मत सुनील शिंदे, प्रवीण दरेकर आदी सदस्यांनी व्यक्त केले. यावर भाडेतत्त्वावरील बसच्या चालकांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

पर्यावरणपूरक सीएनजी बसेस ताफ्यात घ्या!

बेस्टमध्ये 906 मिडी बस कमी रुंदीच्या रस्त्यावर प्रवर्तित करण्यात आल्या आहेत. शिवाय पीएमई-ड्राइव्ह योजने अंतर्गत 1500 मिडी गाड्या आणि  200 मिडी बस अशा एकूण 1700 बस ताफ्यात येणार असल्याचेही सरकारडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने पालिकेकडे तीन हजार कोटींची मागणी केली असता केवळ एक हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे शिंदे या वेळी म्हणाले. शिवाय पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी बेस्टने सीएनजी बस खरेदी कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.