
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील श्री गणेश केमिकल्स कंपनीमध्ये आज सायंकाळी मोठा आगडोंब उसळला. कंपनीत मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचा साठा असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. कंपनीत असलेल्या केमिकलच्या ड्रमचे स्फोट झाल्याने दोन किलोमीटरच्या परिसराला भूकंपासारखे हादरे बसले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमन दलासह जिल्ह्यातील सर्वच महापालिकांचे अग्निशमन बंब घटनास्थळी आले. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते.
आनंदनगर एमआयडीसीतील श्री गणेश केमिकल्स कंपनीत आज सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीत रासायनिक पदार्थांचा मोठा साठा असल्याने क्षणार्धात सर्व कंपनी आगीच्या विळख्यात सापडली. कंपनीत असलेल्या केमिकलने भरलेल्या डुमचे मोठमोठे स्फोट झाले. त्यामुळे या कंपनीच्या दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या परिसराला हादरे बसले. या आगीची झळ जवळपास असलेल्या कंपन्यांना बसली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर या भागातील कामगारांची एकच पळापळ उडाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसीचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिकांचे अग्निशमन बंबही घटनास्थळी आले. त्यामुळे या कंपनीच्या जवळ असलेल्या काही कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत ही आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. या कंपनीत असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे एमआयडीसी परिसरात धुराचे मोठे लोट
उठले होते. आगीत कोणी कामगार जखमी झाले आहेत का, याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.
नालासोपाऱ्यात प्लास्टिक कारखाना जळाला
नालासोपारा फाटा परिसरातील चॅम्पियन कंपाऊंडमधील एका प्लास्टिक कारखान्याला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भिवंडीत वखार खाक
भिवंडी शहरातील कचेरी पाडा परिसरातील एक लाकडाची वखार आज भीषण आगीत खाक झाली. या वखारीमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू आणि लाकडाचा साठा करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने वखारीच्या परिसरात असलेल्या झाडाझुडपांना लावलेली आग थेट वखारीपर्यंत पसरत आल्याने वखार आगीच्या विळख्यात सापडली. या आगीची माहिती भिवंडी अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांच्या तीन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.



























































