
कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या भावी वकिलांनी पोलिसी खाक्याचा ‘अभ्यास’ केला. विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजावी या उद्देशाने आचार्य मंजुनाथ लॉ कॉलेज, शेलू येथील विद्यार्थ्यांनी नेरळ पोलीस ठाण्याला शैक्षणिक भेट दिली. या भेटीत तीन वर्षे व पाच वर्षे अशा दोन्ही अभ्यासक्रमातील एलएलबीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद प्रक्रिया, तक्रार नोंदविणे, एफआयआर दाखल करणे, आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया, न्यायालयीन कोठडी व पोलीस कोठडी, तसेच आरोपीला जेलमध्ये पाठविण्याची कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली. गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने केला जातो, पंचनामा, पुरावे गोळा करणे आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महिला पोलीस अधिकारी प्राची पांगे यांनी महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, सायबर गुन्हे तसेच महिलांशी संबंधित गुन्ह्यांबाबत नेरळ पोलीस ठाणे पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारी व त्यावरील कारवाईची माहिती दिली. महिलांसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन सेवा व संरक्षणाच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य अॅड. गायकवाड, शिक्षक किर्ती बदले उपस्थित होते.
अधिकाऱ्यांशी संवाद
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरी, गुन्हे नोंद वही, तपास प्रक्रिया तसेच पोलीस ठाण्यातील विविध विभागांची माहिती प्रत्यक्ष घेतली. विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत विविध कायदेशीर प्रश्न विचारले व त्यांची उत्तरेही जाणून घेतली.



























































