
कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी नोकरीवरून कमी केल्यामुळे आदिवासी आश्रमशाळेत काम करणाऱ्या 60 महिलांनी सरकारची आज जोरदार धुलाई केली. या महिलांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आवारातच धुणीभांडी करून प्रशासनाचा निषेध केला.
आदिवासी विकास विभागाच्या एका निर्णयामुळे तब्बल 20 वर्षे प्रामाणिकपणे आदिवासी आश्रमशाळेत वर्ग 4 पदावर कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या जवळपास 60 महिलांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात भूमिपुत्र एल्गार संघटना मैदानात उतरली असून आज जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आवारातच कपडे घेऊन भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली धुलाई आंदोलन सुरू केले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांचे मानधन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.




























































