
टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर आता हिंदुस्थानी संघाच्या भव्य ‘व्हिक्टरी परेड’ची मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विश्वविजेता संघ मायदेशी परतल्यावर सर्वप्रथम नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याती शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर सर्व खेळाडू मुंबईत दाखल होतील. मात्र बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत आल्यानंतर 11 किंवा 12 मार्च रोजी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमदरम्यान ओपन बसमधून टीम इंडियाचा भव्य रोड शो आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमवर या सोहळ्याचा समारोप होईल, जिथे बीसीसीआयकडून खेळाडूंचा विशेष सत्कार करून बक्षीस देण्यात येईल. या वेळापक्षकामुळे मुंबईकरांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे सगळेच टीम इंडियाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
टीम इंडियाची अशी विजयी परेड 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली आणि 2024 मध्ये रोहितच्या सैन्याने जसा माहोल केला होता, तसाच काहीसा नजारा यंदाही पाहायला मिळणार आहे. मरीन ड्राईव्हवर होणारी चाहत्यांची संभाव्य प्रचंड गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलीस आणि प्रशासनाकडून आतापासूनच चोख सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला जात आहे. चाहत्यांना आपल्या लाडक्या खेळाडूंना जवळून पाहता यावे आणि हा ऐतिहासिक क्षण अनुभवता यावा, यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.
या विश्वचषकात हिंदुस्थानी संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व गाजवले. विशेषतः न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या फलंदाजांनी किवी गोलंदाजांची पिसं काढत 20 षटकांत 255 धावांचा आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने 4 आणि अक्षर पटेलने 3 बळी घेत न्यूझीलंडचा डाव अवघ्या 159 धावांत गुंडाळला. या विजयानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी मैदानावर आपल्या कुटुंबीयांसह विजयाचा जोरदार जल्लोष केला असून, आता हाच उत्साह मायदेशात चाहत्यांसोबत साजरा करण्यासाठी संघ सज्ज आहे.


























































