
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री जम्मूमध्ये जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जम्मूमधील ग्रेटर कैलाश भागातील एका विवाह सोहळ्यात एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात फारुख अब्दुल्ला सुरक्षित असून ते थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला हे ग्रेटर कैलाश येथील एका बँक्वेट हॉलमध्ये विवाह सोहळ्यासाठी आले होते. ते कार्यक्रम संपवून बाहेर पडत असतानाच आरोपीने त्यांच्यावर गोळी झाडली. यावेळी त्यांच्यासोबत जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. गोळीबाराच्या या घटनेत उपमुख्यमंत्र्यांना छर्रे लागल्याने ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी तातडीने जागीच पकडले असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कमल सिंग जमवाल असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपी नशेच्या धुंदीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर जम्मू-कश्मीरमधील व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत ही सुरक्षेतील गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

























































