
>> मनीष बागलकोटे
बोर अभयारण्यातील कतरीना वाघिणीच्या मातृसत्ताक साम्राज्याच्या या पाऊलखुणा… कतरीनाच्या गोंडस, परंतु तितक्याच भेदक नजरेच्या बछडय़ांचे बागडणे, मस्ती, त्यांच्या डोळ्यांतील कुतूहल टिपणारे हे क्षण…
नागपूरपासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर असलेले बोर अभयारण्य वन्यजीवप्रेमींसाठी पर्वणीच. बोर अभयारण्य निसर्गाने समृद्ध असे वनक्षेत्र. सांबर, हरीण, अस्वल, विविध पक्षी अशा विपुल जैवविविधतेने समृद्ध अभयारण्य. बोर अभयारण्य तुम्हाला अनेक वळणांवर आठवण करून देते ती कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाची. पाणवठय़ातील खडकाळ भाग तुमच्या मनातील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाची प्रतिकृती पुन्हा उभी करते. नागपूर ते महाराष्ट्राचे कॉर्बेट अगदी हाकेच्याच अंतरावर. वाघाची डरकाळी ऐकू येईल इतकेच काय ते अंतर.
इथं राज्य करणारी कतरीना वाघीण आपल्या मातृसत्ताक साम्राज्याच्या पाऊलखुणा अधिक गडद ठळक करणारी. गेली 11 वर्षे कतरीना बोर अभयारण्यावर आपले वर्चस्व ठेवून आहे. कतरीनाने एक दशकाहून अधिक काळ राज्य करताना 19 बच्छडय़ांना जन्म दिला. दुर्दैवाने त्यापैकी एकही बछडा जगू शकला नाही. कतरीनाची 14 वर्षांत सहा बाळंतपणे झाली, त्यापैकी 18 बच्छडय़ांची व्याघ्र संवर्धनात भर पडली आहे.
सध्या कतरीना ही आपल्या 14 महिन्यांच्या दोन बच्छडय़ांना शिकार आणि जगण्याचे संस्कार करताना पर्यटकांना दिसते आहे. शिकारीचे प्रशिक्षण अनेकदा दुर्मिळ असले तरी पर्यटकांना बघण्यास मिळू शकते. आपले बच्छडे स्वत:च्या पायावर उभे करण्याची कतरीनाची धडपड प्रकर्षाने दिसते. शिकार केल्यावर बछडय़ांना तीन-चार दिवस कतरीना एकटी सोडून जाते. आईपासून पिल्लांना विभक्त होण्याची प्रािढया भावनिक असली तरी तो निसर्गनियम आहे. वन्यजीव त्या तत्त्वाचे पालन प्रामाणिकपणे करत आले आहेत.
आई अचानक दिसेनाशी होते याची आता दोन्ही बच्छडय़ांना सवय होऊ लागली आहे. कधीतरी ती वेळ येईल ज्याक्षणी अचानक कतरीना कायमची पिल्लांना दिसेनाशी होईल. हा निर्णय कतरीना तेव्हाच घेईल ज्या वेळी तिला खात्री होईल आपले बछडे आता स्वयंपूर्ण झाले आहेत.
या अभयारण्यात कतरीनाचे बछडे आता तात्पुरते बागडताना दिसतात. भावाभावांची मस्ती, खेळ कुतूहल सगळंच मोहक. त्यांच्या डोळ्यांतले कुतूहल माणसे, वाहने बघताना लपत नाही. भावांचे प्रेम सध्या परकोटीचे. उद्या याच प्रेमात, बंधुभावात संघर्ष दिसेल. आजची निरागसता उद्याच्या संघर्षात परिवर्ततीत होईल तेव्हा वेगळे चित्र असेल. कतरीनाचे वैशिष्टय़ की, तिने 18 बछडे बोर अभयारण्यास दिले. मात्र तिने स्वतचे साम्राज्य अबाधित ठेवले आहे. रणथबोरची मछली आणि बोरची कतरीना यात अनेक बाबतींत साम्य आहे. बोर देशातील अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रतिबिंब आहे. एकाच वेळी निसर्गाच्या अनेक छटांची अनुभूती देणारे बोर अभयारण्य.
ह शब्दांकन : प्रतीक राजूरकर
[email protected]
























































