
अमेरिकेतील ‘यु-व्हिसा’ (U-Visa) मिळवण्यासाठी सशस्त्र दरोड्याचा बनाव रचल्याप्रकरणी 11 हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकन तपास यंत्रणांनी अटक केली आहे. व्हिसा फसवणुकीच्या उद्देशाने या सर्वांनी मिळून गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप तेथील तपासकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या टोळीने विविध व्यावसायिक ठिकाणांवर बनावट दरोडे घडवून आणले. अमेरिकेत ‘यु-व्हिसा’ हा अशा व्यक्तींना दिला जातो जे गंभीर शारीरिक किंवा मानसिक छळाला बळी पडतात आणि गुन्ह्याच्या तपासात कायदा अंमलबजावणी संस्थांना मदत करतात. हीच बाब लक्षात घेऊन आरोपींनी स्वतःला गुन्ह्यातील विक्टिम म्हणून दाखवण्यासाठी हा बनाव रचला होता.
या कटाचे नियोजन अतिशय पद्धतशीरपणे करण्यात आले होते. तपासात समोर आले की, आरोपींनी किराणा दुकाने, मद्याची दुकाने आणि फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये किमान सहा बनावट दरोडे घडवून आणले. यामध्ये एक व्यक्ती बनावट शस्त्र घेऊन दुकानात शिरायची आणि रोख रक्कम चोरून पळून जायची. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होईल याची खात्री केली जात असे, जेणेकरून तो खरा गुन्हा वाटावा.
धक्कादायक बाब म्हणजे, दरोड्याचा बनाव रचल्यानंतर आरोपी तातडीने पोलिसांना फोन करत नव्हते. ‘दरोडेखोराला’ पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी ते मुद्दाम 5 ते 10 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त काळ थांबून मगच पोलिसांना कळवत असत. या कटात सहभागी होण्यासाठी आरोपींनी पैसे मोजल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून, ही रक्कम दुकान मालकांनाही वाटली जात होती.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये जितेंद्रकुमार पटेल, महेशकुमार पटेल, संजयकुमार पटेल यांच्यासह 11 जणांचा समावेश आहे. अमेरिकन कायद्यानुसार, व्हिसा फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि अडीच लाख डॉलर्सपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयात यांचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत सर्व आरोपींना निर्दोष मानले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



























































