अमेरिकेचा मोठा गेमप्लॅन; युद्धाच्या रणांगणात आता AI चॅटबॉटचा वापर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशामंध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युद्धात एक मोठे पाऊल टाकले आहे. अमेरिकन संरक्षण कंत्राटदार ‘पॅलंटिर’ने लष्करी विश्लेषकांसाठी एक विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली विकसित केली आहे. यामुळे आता युद्धभूमीवरील रणनीती आखणे अधिक सोपे होणार आहे. ‘ॲन्थ्रोपिक’ (Anthropic) या AI कंपनीच्या सहकार्याने ‘क्लॉड’ (Claude) हा चॅटबॉट पॅलंटिरच्या संरक्षण प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ही प्रणाली विस्तीर्ण डेटा संचातील नमुने शोधून काढण्यासाठी आणि लष्करी हालचालींदरम्यान अचूक निर्णय घेण्यासाठी इंटेलिजन्स एजन्सींना मदत करणार असल्याचे सॉफ्टवेअर डेमोमधून स्पष्ट झाले आहे.

या तंत्रज्ञानामुळे रडार किंवा सॅटेलाइट इमेजरीमधील शत्रूच्या संशयास्पद हालचालींची माहिती लष्करी विश्लेषकांना मिळू शकणार आहे. एखाद्या विशिष्ट उपकरणाच्या रचनेवरून तिथे कोणते लष्करी पथक तैनात असू शकते, याचा अंदाज AI वर्तवू शकते. इतकेच नव्हे तर, गरजेनुसार अधिक माहिती मिळवण्यासाठी टेहळणी ड्रोन पाठवण्याची सूचनाही ही प्रणाली देऊ शकते. यामुळे मानवी विश्लेषकांचे काम अधिक वेगवान आणि अचूक होण्यास मदत होईल.

केवळ माहिती गोळा करणेच नव्हे, तर ही AI प्रणाली युद्धासाठी ‘कोर्सेस ऑफ ॲक्शन’ म्हणजेच संभाव्य कृती आराखडे देखील तयार करू शकते. यामध्ये हवाई हल्ला, तोफखाना वापरणे किंवा जमिनीवरील तुकडी तैनात करणे यांसारखे पर्याय सुचवले जातात. एकदा कमांडरने आराखडा मंजूर केला की, लष्करासाठी मार्ग निश्चित करणे आणि शत्रूचा संवाद खंडित करण्यासाठी जॅमिंग उपकरणांचे नियोजन करणे, अशी तांत्रिक कामेही हे सॉफ्टवेअर पार पाडते.

पॅलंटिर 2017 पासून अमेरिकन लष्कराच्या ‘प्रोजेक्ट मेवेन’चा (Project Maven) मुख्य कंत्राटदार आहे. या प्रकल्पांतर्गत त्यांनी ‘मेवेन स्मार्ट सिस्टम’ विकसित केली आहे.