उन्हाच्या तडाख्यानंतर अवकाळीचे सावट, सात जिल्ह्यांना ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेने हैराण केले असतानाच आता अवकाळी पावसाचे सावट घोंघावत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सात जिल्ह्यांत अवकाळी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशीव, चंद्रपूर व गडचिरोली या जिह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल, असा इशारा देत हवामान खात्याने ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात उन्हाने कहर केला आहे. उष्णतेच्या लाटेने मुंबईसारख्या अनेक शहरी भागांनाही हैराण केले. मागील दोन दिवसांत काही शहरांमध्ये उष्णतेची तीव्रता कमी झाली आहे. मात्र ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा कायम आहे. अशातच हवामान खात्याने सात जिल्ह्यांना अवकाळी वादळी पावसाचा अ‍ॅलर्ट दिला आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा जास्त फटका बसण्याची भीती आहे, तर पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पावसाचे वातावरण राहणार आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असेल. मात्र उर्वरित विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. 17 ते 20 मार्चदरम्यान विदर्भात गारपीट होऊ शकते, तर मराठवाड्यातील बीड व धाराशीव जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईकरांना तात्पुरता दिलासा

सूर्य जणू आग ओकत असल्यासारखी उन्हाची तीव्रता सहन केलेल्या मुंबईकरांना रविवारी उष्णतेच्या लाटेपासून तात्पुरता दिलासा मिळाला. शहराच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची घसरण झाली. सांताक्रूझमध्ये 31.9 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तथापि, किमान तापमान 3 अंशांनी अधिक म्हणजेच 23.5 अंश इतके नोंद झाले.

उष्माघाताचा ज्येष्ठांना त्रास

ग्रामीण भागांतील उष्म्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः श्वसनविकार आणि दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांची उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रचंड दमछाक होत आहे. त्यातच अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही दिवस उष्णतेची लाट आणि काही दिवस ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस अशा विचित्र वातावरण बदलामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.