
हिंदुस्थानात तरुणांमध्ये बेरोजगारीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा ही बाब चिंतेचा विषय बनली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये 15–29 वयोगटातील बेरोजगारी दर 14.8% वर पोहोचला असून, हा मागील चार महिन्यांतील सर्वाधिक आकडा असल्याचे नुकतेच समोर आले आहे. जानेवारी 2026 मध्ये बेरोजगारीचा दर हा 14.7% इतका होता. तर हा दर फेब्रुवारीमध्ये वाढून, 14.8% इतका झाला. याआधी ऑक्टोबर–डिसेंबर 2025 तिमाहीत हा दर 14.3% पर्यंत खाली आला होता. म्हणजेच एकूण या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास, केवळ काही महिन्यांनंतर बेरोजगारी पुन्हा वाढताना दिसत आहे.
हिंदुस्थान सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर; Meta चा धक्कादायक अहवाल
ही बेरोजगारी वाढण्याची काही महत्त्वाची कारणे तज्ज्ञांनी स्पष्ट केली आहेत. यामध्ये शहरी भागातील रोजगारनिर्मिती ही लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे. तसेच शिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात घटले आहे. केवळ इतकेच नाही तर, महिलांमध्ये सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण हे दिवसागणिक वाढू लागले आहे. याजोडीला अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्रांमध्ये आलेली मंदी सुद्धा बेरोजगारीमध्ये वाढीस कारणीभूत ठरत आहे.
अहवालानुसार, शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी अधिक वाढताना दिसत आहे. केवळ इतकेच नाही तर, स्किल आणि उपलब्ध नोकऱ्यांमध्ये असलेला गॅप हादेखील बेरोजगारी वाढीसाठी महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा मानला जात आहे.


























































