
राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या काही कारनाम्यांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे दिसून येत आहे. खरात याला अटक झाली असून चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गच्छंती आहे. या दरम्यान चाकणकर या सध्या फरार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
रूपाली चाकणकर फरार. बजाव टाली”, असे म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टने खळबळ उडाली असून विविध चर्चांना पेव फुटले आहे. अनेकांनी या पोस्टवरून चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.
‘कॅप्टन भोंदूबाबा’चे कारनामे वर्तमानपत्रांतून उघड करणाऱया संपादकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोन करून धमकावले होते. एवढेच नाही तर खरात याच्याशी संबंधित ट्रस्टवरदेखील त्या आहेत. चाकणकर यांना पदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली असून चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकणकर यांना कधी नारळ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फडणवीसांच्या निशाण्यावर अर्धे कॅबिनेट!
राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यांची फाईल्स उघडताच महायुतीच्या नेत्यांत धाकधूक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅक्शन मोडवर येत कॅप्टन खरातभोवती फास आवळल्यामुळे या भोंदूबाबाच्या संपर्कात असणारे सर्वच जण संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खरातसोबतच्या सलगीमुळे मिंधे गटाचे टेन्शन वाढले आहे, तर रूपाली चाकणकर यांच्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादीही चांगलीच अडचणीत आली असून फडणवीसांच्या निशाण्यावर शिंदे यांच्यासह अर्धे कॅबिनेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.




























































