वेब न्यूज – रोबोटला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

चीनमधील मकाऊ येथे नुकतीच एका रोबोटला अटक झाल्याची बातमी खूप व्हायरल झाली आहे. मात्र ही घटना थोडी गैरसमज आणि विनोद अशा पद्धतीने घडल्याचे आता समोर येत आहे. झाले काय, तर एक ह्युमनॉईड रोबोट (मानवासारखा दिसणारा रोबोट) रस्त्यावर सार्वजनिक प्रदर्शनासाठी वापरला जात होता. हा रोबोट Unitree Robotics या कंपनीचा G1 मॉडेल होता. एका अरुंद रस्त्यावर एक वृद्ध महिला मोबाईल वापरत उभी होती तेव्हा हा रोबोट तिच्या मागे शांतपणे उभा राहिला होता. मात्र अचानक तो दिसल्यामुळे आधी ती घाबरली आणि नंतर संतापली.

भीती आणि संतापाच्या भरात या महिलेने रोबोटवर ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर खबरदारी म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नव्हती. हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी रोबोटला तिथून हटवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काही लोकांनी मजेत याला ‘‘रोबोटला अटक झाली’’ असे म्हणायला सुरुवात केली. प्रत्यक्षात रोबोटला कायदेशीर अटक झाली नव्हती तर तो फक्त त्याच्या ऑपरेटरकडे परत देण्यात आला.

ही घटना मजेशीर असली तरी काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत आणि काही प्रश्नदेखील उभे राहिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी हे रोबोट कितपत सुरक्षित आहेत? असे रोबोट लोकांच्या खूप जवळ आले तर धोका संभवतो का? रोबोटचे वर्तन किती प्रमाणात नियंत्रित असावे? एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? मशीन की मालकाची? रोबोटला अटक हा खरोखरचा कायदेशीर मुद्दा होऊ शकतो का? यामुळे भविष्यातील AI, रोबोटिक्स आणि कायदे याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. रोबोटना कायदेशीर अधिकार द्यावेत का? यासंदर्भातदेखील मोठ्या प्रमाणावर वाद घडताना दिसून येत आहे. रोबोटकडून एखादी दुर्घटना घडल्यास तिची जबाबदारी निश्चित करणारे नियम लवकरात लवकर बनवण्याची आवश्यकता आहे याबद्दल मात्र सर्वांचे एकमत आहे.