
मध्य पूर्वेमध्ये गेल्या 23 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आखातातील देशही ओढले गेले आहेत. आता या युद्धामध्ये ब्रिटनही उडी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने आपली अण्वस्त्रधारी पाणबुडी HMS Anson अरबी समुद्रामध्ये तैनात केली आहे. ही पाणबुडी अत्याधुनिक ‘टोमाहॉक’ क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.
‘डेली मेल’ने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, HMS Anson ही पाणबुडी उत्तर अरबी समुद्रात तैनात करण्यात आली आहे. आगामी काळामध्ये महायुद्धाचा भडका उडाल्यास इराणवर थेट हल्ला करण्याची क्षमता ब्रिटनला यामुळे प्राप्त होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी, ब्रिटीश सरकारने अमेरिकन सैन्याला इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले करण्यासाठी ब्रिटनचे लष्करी तळ वापरण्याची परवानगी दिली होती.
दरम्यान, सुरुवातीला ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी अमेरिकेची लष्करी तळ वापरू देण्याची विनंती फेटाळून लावली होती. कोणतीही लष्करी कारवाई कायदेशीर आहे याची खात्री झाल्याशिवाय परवानगी देता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, इराणने मध्यपूर्वेतील ब्रिटनच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले केल्यानंतर स्टार्मर यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी अमेरिकेला ‘आरएएफ फेअरफोर्ड’ आणि हिंदी महासागरातील ‘दिएगो गार्सिया’ या तळांचा वापर करण्याची मुभा दिली आहे.
पाणबुडी आखातामध्ये रवाना
HMS Anson ही पाणबुडी 6 मार्च रोजी ऑस्ट्रेलियातील पर्थ बंदरातून रवाना झाली. लंडनमधील ‘परमनंट जॉइंट हेडक्वार्टर्स’शी संपर्क साधण्यासाठी ही पाणबुडी दर 24 तासांनी एकदा समुद्राच्या पृष्ठभागावर येते. युद्धाचा भडका उडाल्यास क्षेपणास्त्र डागण्याचे कोणतेही आदेश थेट पंतप्रधान स्टार्मर यांच्याकडून दिले जातील.
दिएगो गार्सियावर हल्ला
हिंद महासागरात असलेल्या अमेरिका-ब्रिटनच्या दिएगो गार्सिया या तळावर इराणने दोन बॅलेस्टिक मिसाईट डागली. हा तळ इराणपासून 4 हजार किलोमीटर अंतरावर आहे. इराणने डागलेली दोन्ही क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत, तरीही इराणकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र असल्याची शक्यता वाढण्याने जगाची चिंता वाढली आहे. याबाबत इस्रायलचे लष्करी प्रमुख एयाल झमीर यांनी प्रतिक्रिया दिली. ही क्षेपणास्त्रे केवळ इस्रायलसाठी नाहीत, तर त्यांचा पल्ला युरोपीय देशांच्या राजधानीपर्यंत आहे. बर्लिन, पॅरिस आणि रोम ही शहरे आता इराणच्या थेट धोक्याखाली आहेत, असे ते म्हणाले.

























































