
केंद्र सरकारने पॅनकार्ड काढण्याच्या प्रक्रियेत काही बदल केले असून 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. पॅनकार्डसाठी अर्ज करताना केवळ आधारकार्ड पुरेसे राहणार नसून अर्जदारांना ओळख आणि जन्माशीसंबंधित अतिरिक्त कागदपत्रे सोबत जोडावी लागणार आहेत.
आतापर्यंत केवळ आधारकार्डच्या आधारे पॅनकार्ड काढणे सोपे होते. अन्य कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नव्हती. मात्र आता पॅनकार्ड काढणे पहिल्यासारखे सोपे राहणार नाही. आता पॅनकार्ड काढण्यासाठी आधारकार्डबरोबर जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, दहावीचे प्रमाणपत्र यासह इतर सरकारी कागदपत्रांची प्रत जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
नवीन नियमांनुसार पॅनकार्डमध्ये नमूद केलेली माहिती आधारकार्डशी पूर्णपणे जुळणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी आधारकार्डमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील अचूक आणि अद्ययावत करणे गरजेचे आहे.























































