
इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध 5 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठ्यांवर 5 दिवस कसलेही हल्ले केले जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले असले तरी इराण काही माघार घ्यायला तयार नाही. अशातच इराणच्या सैन्याने बुधवारी मोठा दावा केला. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ला लक्ष्य करून किनारपट्टीवरून क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे इराणने म्हटले. इराणच्या सरकारी माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतमधील युद्ध आणखी पेटणार अशी चिन्हे आहेत.
इराणच्या ‘प्रेस टीव्ही’ने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात इराणी सैन्याने अमेरिकन युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वर क्षेपणास्त्रे डागल्याचे म्हटले आहे. इराणच्या ‘इर्ना’ या अधिकृत वृत्तसंस्थेने नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या मोहिमेची माहिती दिली आहे.
इराणच्या नौदलाचे कमांडर रिअर ॲडमिरल शाहराम इराणी यांनी सांगितले की, शत्रूच्या या युद्धनौकेच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. ही युद्धनौका इराणच्या क्षेपणास्त्र पल्ल्यात येताच तिला लक्ष्य केले जाईल. दरम्यान, या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे अमेरिकन युद्धनौकेला आपली जागा बदलण्यास भाग पडले. मात्र, अमेरिकेकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचाही समावेश आहे.
अमेरिका-इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह जॉर्डन, इराक आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनीही बंद केली आहे. त्यामुळे जगावर तेल आणि गॅस तुटवड्याचे संकट कोसळले आहे.


























































