मुख्यमंत्र्यांच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यावर एसीबीची झडप, ग्रामविकासाचा निधी मंजूर करण्यासाठी साडेसहा लाख मागितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयाला लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे काळिमा लागला आहे. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक लाच घेताना मंत्रालयातच पकडला गेला होता. ती घटना ताजी असतानाच आज मंत्रालयातीलच एका अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने खारघर येथे रंगेहाथ पकडले. गावच्या विकासासाठी निधी मंजुरीसाठी त्याने साडेसहा लाख रुपये लाच मागितली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास ज्ञानोबा लाड हा जाळय़ात अडकला. त्याला 6 लाख 37 हजार 500 रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. गावातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांसाठी शासकीय निधी मंजूर व्हावा यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या ग्रामस्थाकडून लाड याने ही लाच मागितली होती. या ग्रामस्थाने सरपंचांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या मार्च महिन्यात एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केल्यानंतर लाच मागितली गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाड याला पकडण्यासाठी सापळा रचला गेला. कुणाला कळू नये म्हणून लाड याने संबंधित व्यक्तीला पैसे घेऊन खारघर येथे बोलवले होते. तिथे लाड पकडला गेला.

इतर मंजूर फाइल्सची चौकशी होणार

अर्थ व नियोजन विभागात निधी मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब होते. लाड याच्या डेस्कवर अशा फाईल्सचा ढीग असायचा. त्यामुळे यापूर्वी लाड याने मंजुरी दिलेल्या प्रकरणांचीही चौकशी केली जाणार आहे. लाड व त्याच्या नातेवाईकांच्या संपत्तीचीही तपासणी केली जाणार आहे.