
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळती – सावरगाव ( थोर ) रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हडोळती पासून १ कि. मी. अंतरावर सावरगाव रोडवर १० फुट नदीत कार कोसळली. या अपघातात चालक थोडत्यात बचावला आणि कार सोडून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
सोमवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हडोळतीकडून भरधाव येणारी स्वीफट डिझायर नदीच्या बाजूचे कठडे तोडून दहा फुट नदीत कोसळली. भरधाव कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार नदीत कोसळली. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र, यावेळी समोरून वाहन वगैरे किंवा पादचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातात चालक थोडक्यात बचावला असून घटनेनंतर तो गाडी सोडून फरार झाला. अपघातात गाडीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत होते. गाडीची स्थिती पाहिली असता चालक बचावलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हे या घटनेवरून दिसून येते, अशी चर्चा होती.





























































