
मध्य पूर्वेत सव्वा महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. इराणसाठी आजची रात्र विनाशकारी ठरणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले असून कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही झाला.
मंगळवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक यात मोठी घसरण झाली. जागतिक तणाव, परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला असून सेन्सेक्स 800 हून अधिक अकांनी, तर निफ्टी 240 हून अधिक अकांनी कोसळला. यामुळे अवघ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले असून अवघ्या काही सेकंदात 4 लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.
मंगळवारी बाजार उघडताच सेन्सेक्स 824.44 अंकांनी कोसळून 73,282.41 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 248.95 अंकांची घसरण झाली आणि 22,719.30 अंकांपर्यंच पोहोचला. या पडझडीमुळे गुंतणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी आलेल्या तेजीनंतर बाजारात ‘बुल रन’ सुरू होईल अशी आशा होती. मात्र या आशेवर ट्रम्प यांच्या धमकीने पाणी फिरवले.
दरम्यान, बातमी लिहीपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीत थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 190 अकांच्या घसरणीसह 73,900 च्या आसपास आणि निफ्टी 60 अकांच्या घसरणीसह 22,900 च्या आसपास ट्रेड करत होता. एफएमसीजी, खासगी बँका, रियस्टी आणि फार्मा सेक्टरचे निफ्टी इंडेक्स जवळपास 1-1 टक्के पडले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्येही विक्री दिसून आली असून बीएसईवर लिस्टेंड कंपनीचे मार्केट कॅप 4.24 लाख कोटींनी कमी झाले आहे.
सेन्सेक्समधील फक्त 3 शेअर ग्रीन
दरम्यान, सेन्सेक्समध्ये लीस्ट असलेल्या 30 शेअरपैकी फक्त 3 शेअर ग्रीन असल्याचे दिसले. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा आणि आयटीसी हे शेअरच ग्रीन असून सर्वाधिक घसरण इंडिगो, एटर्नल आणि एमएडएम या शेअरमध्ये झाली आहे.

























































