
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली असून काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार असल्याचे म्हटले. या मताशी आपण सहमत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच लोकशाहीत निवडणूक लढण्यास विरोध कशाला? असा सवाल करत बारामतीचा मतदार शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केले आहे. त्यांनी पक्ष सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसशी राहिली आणि पुढे राजकारणही त्यांनी काँग्रेसबरोबर केले. काँग्रेसला बारामतीची जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसने कौटुंबिक कारणामुळे ती जागा न लढवण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ दुसरे कुणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. लोकशाहीमुळे जर कुणी निवडणूक लढत असेल तर त्याला विरोधा कशा करता? लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांच्या वडिलांनीही निवडणूक लढली होती. काँग्रेसच्या मदतीने ते ही निवडणूक लढले होते हा अलिकडचा इतिहास आहे, असे राऊत म्हणाले.
सुनेत्रा पवार यांच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल, अजितदादांबद्दल आमच्या सद्भावना आहेत. त्या कारणाने शरद पवारांनी आपला उमेदवार दिला नाही. पण काँग्रेस हा महाविकास आघाडीतील स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची भूमिका जर लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. पण उमेदवार देताना त्यांनी एक अट टाकली आहे. जर अर्ज मागे घेण्याची तुमची विनंती आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भातला एफआयआर महाराष्ट्रात दाखल करा, अशी अट काँग्रेसने टाकली आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळीशिवाय चालली आहे. बारामतीचा मतदार शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करेल, असेही ते म्हणाले.
निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य, पोटनिवडणुकीबाबत शरद पवार यांची भूमिका
दरम्यान, राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांची समजूत घातली का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, समजून कुणी सांगत नाही, तर धमक्या दिल्या जातात. समजून सांगायला कोण गेले होते तर विखे-पाटील आणि रवींद्र चव्हाण. ते काय क्रांतिकारी, स्वातंत्र्य सेनाने आहेत का? राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर किती आरोप आहेत. अलिकडे जमिनीचे प्रकरण समोर आले होते. चव्हाणांवरही कोकणात आणि सर्वत्र पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत. हे समजून सांगायला जात नाही, तर धमक्या द्यायला जातात. माघार घ्या नाही तर फाईल काढू, नोटीस मारू. जे या धमक्यांना घाबरतात ते मागे जातात.
सध्या राजकारणात सहज काही मिळत नाही, तुम्हाला लढावे लागते, संघर्ष करावा लागतो. नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. भाजपचे गुलाम म्हणून जगा. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही. भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. कशा करता घाबरायचे? देशात लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

























































