
नागपुरमधील आरएसएस मुख्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटके (जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स) सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथके सखोल तपास करत आहेत. हा एक संवेदनशील परिसर असल्याने सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. नागपुरातील आरएसएस मुख्यालय परिसरात एक बॅग सापडली असून, त्यामधून १५ जिलेटीन स्टिक्स, ५० डेटोनेटर्स आणि ८ कनेक्टर्स जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
आजतक ने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमधील सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. मेट्रो स्टेशनजवळील एका घराच्या छोट्या बागेत १५ जिलेटीन स्टिक्स, ५० डेटोनेटर्स आणि ८ कनेक्टर्स असलेली एक बॅग सापडली. मंगळवारी सकाळी (७ एप्रिल) घरमालकाच्या लक्षात आले की बॅगमध्ये जिलेटीन स्टिक्स आहेत आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली, त्यांनी संपूर्ण परिसर सील केला, शोध घेतला आणि स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही स्फोटके गेल्या एक ते दीड महिन्यांपासून येथे साठवून ठेवल्याचा संशय आहे. प्राथमिक तपासात काटोल परिसरातील स्फोटक कंपनीच्या अलीकडील अपघाताशी याचा संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तथापि याची अद्याप पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून लोकांची चौकशी केली जात आहे.
हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. येथून जामा मशीद सुमारे २०० मीटर, पोद्दारेश्वर राम मंदिर ५०० मीटर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
नागपुरचे सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. बागेत स्फोटके कोणी ठेवली, हल्ल्यामागे काय हेतू होता आणि ती कुठे वापरली जाणार होती, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून, कसून चौकशी केली जात आहे.























































