
टास्कच्या नावाखाली फसवणूकप्रकरणी एकाला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. दीपक मोरे असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार या अंधेरी येथे राहतात. डिसेंबरमध्ये त्यांना वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसली. त्यात विविध ज्वेलरीचे व्हिडीओ लाईक केल्यास चांगले कमिशन मिळेल असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने ती लिंक उघडली. त्यानंतर महिलेला विविध ज्वेलरी पाठवण्यात आली. तिने लाईक केल्यावर काही रक्कम तिच्या खात्यात पाठवण्यात आली.
टास्क पूर्ण केल्यानंतर तिला त्यात चांगला फायदा झाला होता. मात्र तिच्या एका चुकीमुळे तिचे खाते ब्लॉक झाले होते. ते पुन्हा सुरू करण्यासाठी व्रेडिट स्कोअर वाढवावा लागेल. ठगाने भूलथापा मारून तिच्याकडून सव्वा नऊ लाख रुपये घेतले. रक्कम भरल्यानंतर तिची मूळ रक्क्कम आणि कमिशनची रक्कम तिला मिळाली नाही. हा प्रकार लक्षात येताच तिने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. फसवणुकीच्या रकमेपैकी काही रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली होती. त्याने सायबर ठगांना बँक खाते देखील पुरवले होते. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.


























































