16 वर्षांपासून फरार दहशतवाद्यासह पाच जणांना अटक, ‘लश्कर-ए-तैयबा’चे मॉड्युल उद्ध्वस्त, दहशतवाद्यांना आश्रय व रसद पुरवायचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण लश्कर-ए-तैयबाच्या टेरर मॉड्युलचा भाग होते. त्यापैकी एक दहशतवादी 16 वर्षांपासून फरार होता.

जम्मू-कश्मीर पोलिसांसह पेंद्रीय संस्थांनी मिळून ही कारवाई केली. अब्दुल्ला ऊर्फ अबू हुरैरा आणि उस्मान ऊर्फ खुबैब अशी या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे आहेत. अब्दुल्ला हा 16 वर्षांपासून फरार होता. इतर तिघांची नावे मोहम्मद नकीब भट, आदिल राशीद भट आणि गुलाम मोहम्मद मीर ऊर्फ मामा अशी असून ते श्रीनगरचे रहिवासी आहेत. त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्यासह जेवण तसेच इतर रसद व वाहतुकीची मदत केल्याचा आरोप आहे. जम्मू-कश्मीरसह राजस्थान, हरयाणासह 19 ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यात ‘लश्कर’च्या टेरर मॉड्युलची माहिती समोर आली. या मॉड्युलद्वारे दहशतवाद्यांना आर्थिक तसेच वाहतुकीसंदर्भात मदत करण्यात येत होती.

2010 मध्ये केली होती घुसखोरी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्करच्या मदतीने दोन दहशतवादी हिंदुस्थानात शिरले होते. ते वेगवेगळ्या जिल्ह्यांत आतापर्यंत सक्रिय होते. त्यांनी जवळपास 40 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले. त्यापैकी बहुतांश दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र बनावट कागदपत्रे आणि ओळखीच्या आधारे घुसखोरी केलेला एक दहशतवादी देशाबाहेर पळून गेला.