देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुदानमध्ये लग्नात ड्रोनने हल्ला, 30 ठार

सुदानच्या दारफूर क्षेत्रात एका लग्न समारंभात झालेल्या ड्रोन हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि छोटय़ा मुलांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्याची माहिती दिली. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाचे प्रवत्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला उत्तर दारफूरच्या पुतूम गावात झाला. हा हल्ला सुदानी सैन्य आणि अर्धसैनिक दल रॅपिड सपोर्ट पर्ह्सेज यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावेळी झाला. या हल्ल्याला सुदानी सशस्त्र दलाला जबाबदार ठरवण्यात आले आहे. एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

इंधन महागल्याने आयर्लंडमध्ये लोक रस्त्यावर

आयर्लंडमध्ये इंधनाच्या किमती वाढवण्यात आल्याने त्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. जनतेने सलग चौथ्या दिवशी या किमतीविरोधात आंदोलन केले. आयर्लंड सरकारने देशातील शेतकरी, ट्रक चालक आणि पृषी ठेकेदार यांच्यासोबत इंधन दरवाढी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. सरकारकडून वाढवलेल्या इंधनाच्या किमती तत्काळ कमी कराव्यात, अशी मागणी आंदोलकांची आहे. देशात इंधन महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम झाला आहे. सरकारने आंदोलकांशी चर्चा करून इंधनाच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बैसाखीसाठी शीख बांधवांचा जत्था पाकिस्तानला रवाना

बैसाखी निमित्त पाकिस्तानातील ऐतिहासिक गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी हिंदुस्थानातून हजारो शीख भाविक रवाना झाले. अटारी-वाघा सीमेवर शीख भाविकांच्या शुक्रवारी रांगा लागल्या होत्या. पाकिस्तानला जाणाऱया भाविकांकडे व्हिसा असूनही त्यांना सीमेवर रोखण्यात आल्याने काही वेळ वाद निर्माण झाला होता. जर आमच्याकडे वैध व्हिसा आहे, तर आम्हाला रोखण्याचे कोणतेही कारण नाही, असा संतप्त सवाल भाविकांनी केला.

केटामाइन क्वीनला 15 वर्षांची शिक्षा

अमेरिकेत केटामाइन क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबी वंशाच्या जसवीन संघा नावाच्या महिलेला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लॉस एंजेलिस फेडरल कोर्टाच्या न्यायाधीश शेरिलिन पीस गार्नेट यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. जसवीनची आई नीलम सिंग आणि वडील बलजीत सिंग छोकर उद्योगपती आहेत. जसवीन अमेरिका-ब्रिटनची दुहेरी नागरिक आहे.