निवडणूक आयोग आणि भाजप मिळून माझी उमेदवारी रद्द करण्याचा कट, ममता बॅनर्जी यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी रद्द करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशियारी येथे आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून उमेदवारी रद्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने एकजूट दाखवत हा डाव उधळून लावला, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी विशेष SIR प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. “पश्चिम बंगालमध्ये सुमारे 90 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, त्यात 60 लाख हिंदू आणि 30 लाख मुस्लिम आहेत. तसेच या प्रक्रियेदरम्यान 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला,” असा दावा त्यांनी केला.

मतदार याद्यांमधील नाव वगळण्यामागे निवडणूक निकालावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM) फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागरिकत्व आणि ओळखीच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या, “आपण बंगाली बोलतो म्हणून आपण भारतीय नाही का? आपल्याला सतत नागरिकत्व सिद्ध करावे लागणार का?” या प्रश्नांद्वारे त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर अप्रत्यक्ष टीका केली.

याशिवाय, भाजपने सत्तेत आल्यास समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या आश्वासनावरही त्यांनी आक्षेप घेतला. हा निर्णय मागासवर्गीय समाजाच्या विरोधात जाईल आणि लोकशाही अधिकारांवर गदा आणेल, असा आरोप त्यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, पश्चिम बंगालमध्ये UCC लागू करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला तृणमूल काँग्रेस कडाडून विरोध करेल. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात राजकीय लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.