
एकामागून एक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीची उंची वाढवणारे दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली आता त्यांच्या आगामी ‘वाराणसी’ या चित्रपटामुळे जागतिक स्तरावर एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, केवळ भव्य स्टारकास्टच नाही, तर या चित्रपटासाठी राजामौली पडद्यामागे करत असलेली तांत्रिक तयारी हिंदुस्थानी सिनेमाचा चेहरामोहरा बदलून टाकणारी ठरणार आहे.
हॉलिवूडमध्ये मोशन कॅप्चर आणि प्रगत व्हीएफएक्स (VFX) तंत्रज्ञानाचा वापर नित्याचा असला, तरी हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत अजूनही या साधनांच्या सर्वोत्तम वापराबाबत मर्यादा जाणवतात. राजामौली यांनी ‘बाहुबली’च्या माध्यमातून अशा अनेक नवनवीन प्रयोगांचा पाया रचला होता, जे आता हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत प्रमाण मानले जातात. आता ‘वाराणसी’ला तांत्रिकदृष्ट्या जागतिक तोडीचे बनवण्यासाठी ते अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहेत. विविध विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजामौली सध्या एका अत्याधुनिक एआय-सक्षम व्हीएफएक्स स्टुडिओच्या उभारणीवर काम करत आहेत. यासाठी त्यांनी एका आंतरराष्ट्रीय व्हीएफएक्स कंपनीशी भागीदारी केली असून, आंध्र प्रदेश सरकारसोबतही त्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते.
हिंदुस्थानला व्हीएफएक्सचे जागतिक केंद्र मानले जात असले, तरी सध्या हिंदुस्थानी कंपन्यांना प्रामुख्याने फ्रेम क्लिनिंग किंवा गर्दी दाखवण्यासारखी तांत्रिक कामेच परदेशी स्टुडिओकडून दिली जातात. ‘आरआरआर’मधील राम चरणच्या इंट्रो सीनमध्ये मोजक्या लोकांच्या गर्दीला हजारो लोकांमध्ये रूपांतरित करण्याचे काम हिंदुस्थानी तंत्रज्ञांनी यशस्वीपणे केले होते. मात्र, प्राण्यांचे वास्तववादी चित्रीकरण किंवा सूक्ष्म तपशीलांसाठी आजही हिंदुस्थानच्या निर्मात्यांना अमेरिका, यूके किंवा कॅनडातील कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. परदेशी कंपन्यांना काम देण्यामुळे केवळ चित्रपटाचे बजेटच वाढत नाही, तर प्रक्रियेत वेळही अधिक जातो आणि अनेकदा गुणवत्तेत तफावत निर्माण होते.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा ‘प्री-व्हिज्युअलायझेशन’ या तंत्राचा आहे. हॉलिवूडमध्ये जेम्स कॅमेरॉन सारखे दिग्दर्शक चित्रीकरण करतानाच कलाकारांना त्यांच्या सभोवतालच्या डिजिटल जगाचा आभास निर्माण करून देतात, ज्यामुळे अभिनयात जिवंतपणा येतो. याउलट, हिंदुस्थानी कलाकारांना आजही कल्पनाशक्तीच्या जोरावर निळ्या किंवा हिरव्या पडद्यासमोर अभिनय करावा लागतो. राजामौलींच्या ‘वाराणसी’निमित्त साकारला जाणारा हा नवा स्टुडिओ ही दरी भरून काढण्यास मदत करेल. यामुळे हिंदुस्थानी चित्रपट निर्मात्यांना एकाच छताखाली जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध होईल, ज्यामुळे खर्च आणि वेळ दोन्हीची बचत होईल. या व्हीएफएक्स स्टुडिओव्यतिरिक्त राजामौली वाराणसीसाठी आणखी दोन मोठ्या तांत्रिक सुधारणांवर काम करत असून, त्या हिंदुस्थानी चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील अशी चिन्हे आहेत.





























































