सलमान खानच्या ‘मातृभूमी’मध्ये चीनचा उल्लेख नको, संरक्षण मंत्रालयाकडून सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्या या चित्रपटाचे मूळ शीर्षक ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. हा चित्रपट २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षावर आधारित होता. काही आठवड्यांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलून आता ‘मातृभूमी’ असे जाहीर करण्यात आले.

हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता एका अहवालानुसार, या चित्रपटात मोठे बदल केले जात असून, त्यातील ४० टक्के भागाचे पुनर्चित्रीकरण करण्यात आले आहे.

‘बॉलिवूड हंगामा’च्या एका अहवालानुसार, अलीकडच्या काळात भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारले असल्याने, सलमान खानच्या या चित्रपटातील आशयाबाबत संरक्षण मंत्रालयाला काही आक्षेप होते. सूत्राने या पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, “सुरुवातीला हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित होता. परंतु संरक्षण मंत्रालयाच्या विनंतीनुसार, सलमान खान आणि दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी कथेला काल्पनिक वळण देऊन चित्रपटाचे पुनर्चित्रीकरण केले. त्यानुसार, त्यांनी चित्रपटातील जवळपास ४० टक्के भागाचे पुनर्चित्रीकरण केले; ज्यामध्ये त्यांनी काही रोमँटिक दृश्ये, पार्श्वकथा इत्यादींचा समावेश केला. निर्मात्यांनी चित्रपटाची ही नवीन आवृत्ती सादर केली, त्यांना आशा होती की याला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळेल. परंतु संरक्षण मंत्रालयाच्या मनात अजूनही काही शंका आहेत.”