अमेरिकेवर आमचा विश्वास नाही; शांतता चर्चा सुरू असताना इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे विधान चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशांचे वरिष्ठ नेते पाकिस्तानात दाखल झाले आहेत. याचवेळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चर्चेपूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. त्यांचे हे विधान चर्चेत असून अमेरिका इराणमधील शांततेसाठीची चर्चा यशस्वी होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चर्चा सुरू होण्यापूर्वी, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. अराघची म्हणाले इराण या चर्चेत अविश्वासाने प्रवेश करत आहे. इराणचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. अमेरिकेने दिलेली आश्वासने वारंवार मोडली आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अराघची यांच्या नव्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

अराघची यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने वारंवार दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन केल्यामुळे इराण अविश्वासाने इस्लामाबादमधील चर्चेत सहभागी होत आहे. इराणने अमेरिकेवर फसवणुकीचा आरोप केला आहे. इराणने एक जबाबदार देश म्हणून युद्धविराम स्वीकारला आहे. मात्र, इराणच्या अटींमध्ये संपूर्ण युद्धबंदी, झालेल्या नुकसानीची भरपाई आणि या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई यांचा समावेश आहे. इराणने असा इशाराही दिला आहे की, जर त्यांच्या अटी पूर्ण झाल्या नाहीत, तर चर्चा करण्यात येणार नाही.

इराणचे एक मोठे आणि शक्तिशाली शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ या संघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, सर्वोच्च राष्ट्रीय संरक्षण परिषदेचे सचिव अली-अकबर अहमदीयन, सेंट्रल बँकेचे गव्हर्नर अब्दोलनासेर हेमती आणि संसदेचे अनेक सदस्य आहेत. याचा अर्थ असा की, इराणने सुरक्षा, राजकारण, लष्कर, अर्थव्यवस्था आणि कायदा यासह सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञांना पाठवले आहे.

अमेरिकेच्या वतीने उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, अमेरिकेचे प्रादेशिक दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे जावई व सल्लागार जेरेड कुशनर इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. याचा अर्थ असा की, अमेरिकेनेही आपला सर्वात महत्त्वाचा चमू पाठवला आहे. त्यामुळे या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.