अवैध भंगार व्यवसायावर तात्काळ कारवाई करा; हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहर आणि ग्रामीण भागांत सध्या अवैध भंगार व्यवसायांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. खाजगी जागा विकत अथवा भाडे तत्त्वावर घेऊन हे व्यावसायिक लोकवस्तीत आणि चिपळूण-गोवा आणि चिपळूण-कराड महामार्गालगत उघडपणे कारभार करत आहेत. कारवाईसाठी प्रांताधिकारी अशोक लिगाडे यांनी १५ दिवसांची मुदत मागितली असली, तरी आम्ही त्यांना २० दिवसांची मुदत देत आहोत, जर २७ एप्रिल २०२६ पर्यंत या अवैध व्यवसायांवर आणि संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, तसेच राज्यभरातही भंगारवाल्यांची समस्या वाढत असून त्या विरोधातही समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना लढा देणार आहेत, असा इशारा येथील ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके, शिवसेना गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, विश्व हिंदु परिषदचे पराग ओक, सकल हिंदु समाजाचे राजेश ओतारी, अखिल विश्व गायत्री परिवारचे उमेश महाडिक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी आणि सूरज कदम उपस्थित होते.