
आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या थरारात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ६ गडी राखून पराभव केला आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेले २२० धावांचे विशाल आव्हान पंजाबने ७ चेंडू राखून अत्यंत सहजपणे पूर्ण केले. या विजयासह पंजाबने चालू हंगामातील ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत विजय मिळवत आपली जबरदस्त कामगिरी सुरू ठेवली आहे.
अभिषेक शर्माची फटकेबाजी व्यर्थ
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत २१९ धावांचा डोंगर उभा केला होता. हैदराबादकडून अभिषेक शर्माने अवघ्या २८ चेंडूत ७४ धावांची तुफानी खेळी केली, तर ट्रॅव्हिस हेडने ३८ धावांचे योगदान दिले.
सलामीवीरांचा पॉवरप्लेमध्ये धुमाकूळ
२२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सच्या प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंह यांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. प्रियांशने २० चेंडूत ५७ धावांची स्फोटक खेळी केली, तर प्रभसिमरनने २५ चेंडूत २१ धावा केल्या. या दोघांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांतच तब्बल ९३ धावा कुटल्या होत्या. मात्र, पॉवरप्लेनंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत पंजाबचे दोन्ही सलामीवीर झटपट बाद केले.
एका टप्प्यावर पंजाबची स्थिती ३ बाद १२८ अशी होती आणि त्यांना विजयासाठी ५८ चेंडूत ९२ धावांची गरज होती. विकेट्स पडल्यामुळे धावगती मंदावली होती, अशा कठीण समयी कर्णधार श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारली. अय्यरने अवघ्या २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ३३ चेंडूत ६९ धावा करून तो नाबाद परतला. त्याला नेहल वाढेरा (१४ धावा) आणि शशांक सिंह (९ चेंडूत १६ धावा) यांनी मोलाची साथ दिली.
आयपीएल २०२५ ची उपविजेती असलेल्या पंजाब किंग्सने २०२६ च्या हंगामातही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. ४ सामन्यांनंतर पंजाबचे ३ विजय झाले असून त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या विजयामुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत वरच्या स्थानी पोहोचला आहे.


























































