वरळी एसटीपी प्रकल्पासाठी 27 हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता, हायकोर्टात पालिकेचे प्रतिज्ञापत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता वरळी येथील सांडपाणी प्रकल्पासाठी (एसटीपी) 17 हजार 756 चौमी ऐवजी 27 हजार 698 चौमी जागेची आवश्यकता असल्याची मागणी पालिका प्रशासनाने केली आहे. तसे प्रतिज्ञापत्रच पालिकेने हायकोर्टात दाखल केले आहे.

मुंबई महापालिकेने वरळी येथे सांडपाणी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर वरळी अर्बन डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या वतीने या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबवला जात आहे. पालिकेने या एसआरए प्रकल्पाला स्थगिती दिल्याने वरळी अर्बन डेव्हलपमेंटच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिके प्रकरणी पालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. पालिकेचे उपआयुक्त शशांक भोरे (अभियांत्रिकी) यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे की, वरळीत 500 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

…तर पूर परिस्थिती उद्भवेल!

या भूखंडाखालून ब्रिटिशकालीन दोन मोठय़ा मुख्य मलवाहिन्या जातात. भूपृष्ठापासून सुमारे 30 फूट खोल या मलवाहिन्या असून एफ दक्षिण, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील सांडपाण्यासोबत पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी या वाहिन्या महत्त्वाची भूमिका बजावतात. या वाहिन्यांना धक्का लागल्यास शहरात पूर परिस्थिती उद्भवेल असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.