
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड भुयारी मेट्रोच्या प्रवासासाठी विद्यार्थी आणि पर्यटकांना आता सवलतीच्या दरात पास मिळणार आहेत. 45 आणि 60 ट्रिप पासवर थेट 25 टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) गुरुवारी ही योजना जाहीर केली. ‘डिजिटल मोबिलिटी’ला चालना देण्यासाठी हे सर्व पास ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’वर (एनसीएमसी) उपलब्ध केले जाणार आहेत.
मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱया मेट्रो-3 म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी आणि पर्यटक प्रवास करतात. त्यांच्यासाठी विशेष सवलतीच्या पासची घोषणा एमएमआरसीने केली. या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या मेट्रो प्रवासाचा खर्च 25 टक्क्यांनी कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना मेट्रो प्रशासनाच्या सवलतीच्या पासमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत लागू असणार आहे. विद्यार्थी 45 आणि 60 ट्रिप पासवर 25 टक्क्यांची सवलत मिळवू शकणार आहेत. सवलतीच्या पासची वैधता 30 दिवसांची असेल. मुंबई शहरात फिरण्यासाठी येणाऱया पर्यटकांकरिता मेट्रो प्रशासनाने खास ‘टुरिस्ट पास’ची व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत एकदा पास काढला की कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. पर्यटकांना 1 दिवसाच्या पाससाठी 280 रुपये, तर 3 दिवसांच्या पाससाठी 700 रुपये द्यावे लागणार आहेत.
प्रवासी संख्या 4 कोटींवर
विद्यार्थ्यांसह दिव्यांग प्रवाशांना 45 आणि 60 ट्रिप पासवर 25 टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. नियमित नोकरदारांना ‘मेट्रो कनेक्ट 3’ अॅपवर 45 ट्रिपसाठी 10 टक्के आणि 60 ट्रिपसाठी 15 टक्के सवलत एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून घेता येणार आहे. दरम्यान, आरे ते कफ परेडपर्यंत पूर्ण क्षमतेने धावणाऱया भुयारी मेट्रोची प्रवाशी संख्या 4 कोटींवर पोहोचली आहे. एमएमआरसीने गुरुवारी हा टप्पा गाठल्याचे जाहीर केले.

























































